नवी दिल्ली – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना आता ब्लॅक फंगस हा नवीन साथीचा आजार समोर आला आहे. करोना संसर्गासोबतच देशात ‘ब्लॅक फंगस’चे ही प्रमाण वाढत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये बरीच प्रकरणे आढळली आहेत, जेथे करोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांमध्येही ‘ब्लॅक फंगस’ चे प्रकार आढळले आहेत.
‘ब्लॅक फंगस’ या आजाराने देशाची चिंता अधिकच वाढवलीय. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून ब्लॅक फंगस आजारासंदर्भात अलर्ट केले आहे. तसेच सर्व राज्य सरकारांना हा रोग साथीचा आजार म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे. म्हणजेच आता राज्यांना ब्लॅक फंगस आजाराचे रुग्णांची माहिती, त्यामुळे मृत्यू झालेल्यांची तसेच उपचार सुरु असलेल्यांची नोंद ठेवावी लागेल.
वृत्त संस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, देशात सध्या जवळपास 5500 रुग्ण ब्लॅक फंगसच्या विळख्यात आले आहेत. यातील 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या महाराष्ट्रातच 90 लोकांनी या फंगल इन्फेक्शनमुळे आपला जीव गमावला आहे. तर, हरियाणा 14 आणि उत्तर प्रदेशमध्ये 8 रुग्णांनी या इन्फेक्शनमुळे जीव गमावला आहे. नुकतंच बिहारच्या पाटणामध्ये ब्लॅकनंतर आता व्हाईट फंगसचे रुग्णही आढळले आहेत. त्यामुळे, चिंतेत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, म्युकरमायकोसिसने चेहरा, डोळे,डोळ्याचे मंडळे किंवा मेंदूवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे दृष्टी जाऊ शकते. हे (संसर्ग) फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतं. स्टिरॉइड्सच्या दुरुपयोगामुळे अशा प्रकारच्या संसर्ग होण्याचे प्रकारही वाढत आहेत.