नवी दिल्ली : करोना देशात सर्वत्र हाहाकार माजवला आहे. त्यातच करोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका निर्माण झाला आहे. ब्लॅक फंगसमुळे आतापर्यंत शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, आता ब्लॅक फंगसनंतर आता व्हाइट फंगसचे सावट निर्माण झाले आहे. व्हाइट फंगसचे देशात काही रुग्ण आढळून आले आहेत.
बिहारच्या पाटणामध्ये व्हाइट फंगस म्हणजेच, पांढऱ्या बुरशीचे 4 रुग्ण आढळून आले आहेत. काळ्या बुरशीपेक्षा पांढरी बुरशी जास्त घातक असल्याची माहिती पटना मेडीकल कॉलेजचे हेड डॉ. एसएन सिंह यांनी दिली आहे. सापडलेल्या चारही रुग्णांमध्ये कोरोनासारखी लक्षणे आढळली आहेत. दरम्यान कोरोना संदर्भातील औषधांचा कोणताही परिणाम या बुरशीवर होत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
मेडिकल रिपोर्ट्सनुसार, पांढऱ्या बुरशीचा संसर्ग काळ्या बुरशीच्या तुलनेत अधिक धोकादायक आहे. दरम्यान, अद्याप पांढऱ्या बुरशीचा संसर्ग इतरही राज्यांमध्ये आहे का, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमसीएचमध्ये मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर एस.एन.सिंह यांनी पांढऱ्या बुरशीच्या संसर्गाचा खुलासा केला होता.
पांढऱ्या बुरशीचा फुप्फुसातील संसर्ग हा HRCT मध्ये कोरोनासारखा दिसतो. त्यामुळे कोरोना आहे की, व्हाइट फंगस हे ओळखणे अवघड जाते. अशा रुग्णांच्या रॅपिड अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या निगेटिव्ह येतात. पण करोना रुग्ण ऑक्सिजनवर असेल तर त्याच्या फुप्फुसांना पांढऱ्या बुरशीचा संसर्ग होऊ शकतो.
पांढऱ्या बुरशीचा आजार हा प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होतो. मधुमेह, अँटिबायोटिक घेणे किंवा फार काळ स्टिरॉइड घेतलेल्या रुग्णांना हा आजार बळावण्याची शक्यता असते. कॅन्सरग्रस्त रुग्णांना या आजाराचा धोका अधिक असतो. तसेच अर्भक किंवा नुकत्याच जन्मलेल्या बाळांनाही या आजाराचा धोका असतो.