“निवडणूका जवळ येतात तेंव्हाच भाजपला मागासवर्ग आणि छोट्या पक्षांची आठवण येते”

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे येत्या काही महिन्यात  वारे वाहणार आहे. त्याचीच तयारी सध्या भाजप जोरदार पद्धतीने करत असल्याचे दिसत आहे.  त्याचा प्रत्यय जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला यातून आला आहे. यानंतर आता भाजपकडून छोट्या पक्षांना साद घातली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष हा बुडते जहाज असून, आम्ही त्यांचे सहप्रवासी होऊ शकत नाही, असे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर यांनी म्हटले आहे.

भाजप हे एक बुडते जहाज आहे. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, त्यांनी जावे. पण आम्ही जाणार नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच भाजपला लहान पक्ष आणि मागासवर्ग समाजाची आठवण होते. मात्र, जेव्हा मुख्यमंत्रीपदाची चर्चा केली जाते, तेव्हा बाहेरून माणसे आणली जातात. केवळ मतांसाठी भाजप मागासवर्ग समाजाला जवळ करते. ज्या मुद्द्यावर गेल्या वेळेस युती झाली होती. ते मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत, असा दावा राजभर यांनी केला आहे.

जितीन प्रसाद यांच्या प्रवेशानंतर आता भाजपने अन्य लहान पक्षांना सोबत घेण्यासाठी रणनीती तयार केल्याचे सांगितले जात आहे. अपना दल आणि निषाद पक्षासह सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला भाजपने साद घातली होती. मात्र, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर यांनी याला विरोध दर्शवला असून, भाजपसोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात राजभर यांनी एक ट्विट करून माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेशात शिक्षक भरतीमध्ये मागासवर्ग समाजाला डावलले गेले, त्यांचे हक्क हिरावण्यात आले. मागासवर्ग समाजाला सामावून न घेणारी भाजप कोणत्या तोंडाने मते मागायला जाणार आहे, अशी विचारणा करत भाजपला पराभूत करण्यासाठी भागीदारी संकल्प मोर्चा तयार करण्यात आला असून, आमचा त्यांना पाठिंबा असेल, असे राजभर यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.