मुज्जफरनगर, – उत्तरप्रदेशातील कैरानाचे भाजपचे खासदार प्रदीपकुमार चौधरी यांचा त्यांच्या मतदार संघातील गावात एक स्वागत कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र जमून त्यांच्या कार्यक्रमाच्या विरोधात उग्र निदर्शने केल्याने भाजप खासदाराचा हा कार्यक्रमच रद्द करावा लागला.
शामली जिल्ह्यातील मनसुरा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावचे सरपंच अफसर अली यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी तेथे जमून तेथे घोषणाबाजी व जाळपोळ सुरू केली.
खासदारांच्या स्वागताचे कार्यक्रम स्थळी लावलेले बोर्ड त्यांनी जाळून टाकले. तसेच शेतकरी कार्यक्रम स्थळीच ठिय्या देऊन बसले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सदरचा कार्यक्रमच रद्द करण्यात आला. तेथे जादा बंदोबस्तही तैनात केला गेला.