नवी दिल्ली – गेल्या लोकसभेत म्हणजेच 2019 मध्ये ज्या 160 लोकसभा जागांवर भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते, अशा 160 जागांसाठी पक्ष विशेष मोहीम सुरू करणार आहे. या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधानांच्या ४५ रॅली आयोजित करण्याची तयारी पक्षाने सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सातत्याने या जागांवर मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे रणनीती तयार करत आहेत. भाजपने आपले तीन राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे आणि तरुण चुघ यांच्यावर याबाबतच्या तयारीची जबाबदारी सोपवली आहे.
या लोकसभेच्या जागा वेगवेगळ्या गटात विभागण्यात आल्याचे देखील सांगितले जात आहे. प्रत्येक गटात चार जागा असतील. या महत्त्वाच्या भागात पंतप्रधानांच्या मोठमोठ्या रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे. या भागांमध्ये भाजपच्यावतीने पंतप्रधानांच्या सुमारे ४५ ते ५५ रॅली आणि जाहीर सभांचे आयोजन करण्याचे नियोजन आहे.
दुसरीकडे, या 160 जागा दोन भागात विभागल्या जातील. यादीतील पहिल्या 80 जागांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा रॅली काढणार आहेत. त्याचबरोबर इतर 80 जागांवर गृहमंत्री अमित शहा यांच्या वतीने जाहीर सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पक्षाच्या या बड्या नेत्यांचा निवडणूक प्रचार त्यांच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत या जागांमध्ये वाढ होऊन पक्ष पुन्हा सत्तेत येऊ शकेल. या 160 जागांवर पहिल्या टप्प्यातील प्रचार पूर्ण झाल्यानंतर पक्ष दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात करणार आहे. ज्यामध्ये देशातील उर्वरित 383 जागांसाठी पंतप्रधान मोदी आणि इतर बड्या नेत्यांचे कार्यक्रमही ठरवले जातील.