पिंपरी – कुख्यात गुंड सुनील विश्वनाथ ठाकूर याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोका) अंतर्गत वाकड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. घातक शस्त्रांनी दहशत माजवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच इतर सात गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.
सुनील विश्वनाथ ठाकूर (वय 23, रा. थेरगाव), विजय राहुल तलवारे (वय 19, रा. रहाटणी), अशी कुख्यात गुंडांची नावे आहेत. यातील ठाकूर हा टोळीप्रमुख आहे. त्याच्यावर जबर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्रांनी दहशत निर्माण करणे, असे एकूण सात गुन्हे हिंजवडी, सांगवी व वाकड पोलीस ठाण्यास दाखल आहेत.
आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचार करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटीत गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी प्रस्ताव सादर केला.
अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी प्रस्ताव मंजूर करून मोक्काच्या कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहाय्यक फौजदार सुहास पाटोळे, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण यांनी ही कारवाई केली.