सोक्षमोक्ष: भाजप चाळिशीत !

राहुल गोखले

भारतीय जनसंघ जनता पक्षात 1977 मध्ये विलीन झाला; परंतु जनता पक्षाचे सुरुवातीचे सरकार अल्पायुषी ठरले आणि पुढे जनता पक्षदेखील फुटला. जनसंघाचा नवीन अवतार भारतीय जनता पक्षाच्या रूपाने राजकीय पटलावर आला. 6 एप्रिल 1980 हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस. यंदा भाजपने चाळिशीत प्रवेश केला आहे. गेल्या चार दशकांत राजकरणात अनेक स्थित्यंतरे घडली आहेत आणि एके काळी क्षीण असणारा भाजप 2014 मध्ये स्वबळावर प्रथमच केंद्रात सत्तेत आला. मात्र सांख्यिक वृद्धी होत असतानाच भाजपला अनेक दोषही चिकटले. एकीकडे मोठा पल्ला राजकारणात गाठल्याचे समाधान भाजप नेतृत्वाला असतानाच भाजपच्या हितचिंतकांना आणि समर्थकांना भाजपचे काही अंशी कॉंग्रेसीकरण झाले आहे काय हे शल्यही सलत असल्यास नवल नाही. तथापि कॉंग्रेससमोर आव्हान उभे करून पर्याय उभा करण्याची कामगिरी भाजपने केली.

भाजपचा विस्तार आणि कॉंग्रेसचा संकोच हे एकाच वेळी घडत होते हा योगायोग नाही. राष्ट्रीय विस्तार असणारा कॉंग्रेस पक्ष संकोचत असताना राष्ट्रीय स्तरावर भाजपने ती जागा पर्यायी राजकीय विचारधारेच्या बळावर व्यापली हे उल्लेखनीय.

जनसंघाचा नवीन अवतार असूनही भाजपची वाटचाल गांधीवादी समाजवादापासून झाली. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे मान्य नव्हते. तथापि अटल बिहारी वाजपेयी यांच्या करिष्म्याला आव्हान देणे तसे संघाला सहज शक्‍य नव्हते. 1984 च्या निवडणुकीत भाजपची दाणादाण उडाली आणि भाजपने पुन्हा हिंदुत्वाचा स्वीकार केला आणि नेतृत्व वाजपेयी यांच्याकडून लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे आले. त्यांच्या नेतृत्वात भाजपने भरारी घेतली आणि लोकसभेत भाजपचा आलेख वाढता राहिला. राम मंदिर आंदोलनाने भाजपला नवी उभारी दिली आणि त्याचवेळी कॉंग्रेस किंवा कॉंग्रेसोद्‌भव पक्षांची सत्तेतील कामगिरी निराशाजनक ठरू लागली.

हिंदुत्वाबरोबरच भाजपचा विशेष होता तो चाल, चरित्र आणि चिंतन हा दावा. पार्टी विथ ए डिफरन्स असा स्वतःचा उल्लेख तो पक्ष करू लागला आणि भाजपचे नेतृत्व त्या दाव्याला पुष्टी देणारे होते. अन्य पक्षांमध्ये असणारी घराणेशाही भाजपमध्ये नव्हती आणि कार्यकर्त्यांचा पक्ष अशी भाजपची ओळख होती. तेव्हा संघटनेचे जाळे; मागे रा. स्व. संघाचे पाठबळ आणि चारित्र्यवान नेतृत्व या सगळ्या जमेच्या बाजूंमुळे भाजपला कॉंग्रेसची जागा राजकारणात हळूहळू व्यापता आली. वाजपेयी, आडवाणी, मुरली मनोहर जोशी येथपासून अनेक नेत्यांनी पक्ष बांधला होता आणि आपल्या नेतृत्वाचे वेगळेपण सिद्ध केले होते. हवाला प्रकरणी आरोप झाल्यावर आडवाणी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. हे सगळे त्याकाळच्या सत्तालोभी वातावरणात मतदारांना भुरळ घालणारे होते. तेव्हा भाजपची कमान उंचावत राहिली आणि अखेर 1996 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले. तथापि, ते स्वबळावर नव्हते आणि आघाडी सरकार चालवायचे तर कट्टर हिंदुत्ववादी आडवाणी मित्रपक्षांना मान्य होणारे नव्हते. तेव्हा वाजपेयी यांच्याकडे नेतृत्व आले. ज्या आडवाणी यांच्या रथ यात्रांनी भाजपला सत्तेत पोचविण्यात मोठे योगदान दिले त्या आडवाणी यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली ती आजपर्यंत.

वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली तेरा दिवसांचे, मग तेरा महिन्यांचे आणि मग पाच वर्षांचे सरकार आले. अर्थात ती सर्व सरकारे आघाडी सरकारे होती आणि वाजपेयी यांच्यामुळे ती तरली. मात्र 2004 साली भाजपच्या फाजील आत्मविश्‍वासाने भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनतर भाजपमध्ये पिढीचा बदल होत गेला. वाजपेयी निवृत्त झाले; जीना-वादाने-आडवाणी यांना अडगळीत जावे लागले आणि मोदी-गडकरी-राजनाथ सिंग यांचा उदय झाला. प्रमोद महाजन यांची हत्या; गोविंदाचार्य यांच्यासारख्यांचे पक्षापासून दूर जाणे या सर्व बाबींमुळे भाजप नव्या नेतृत्वाच्या शोधात होताच. गडकरी यांच्यावर झालेल्या काही आरोपांमुळे त्यांना पक्षाध्यक्षपदाचा वाढीव कार्यकाळ मिळाला नाही आणि गुजरातेतील गोध्राकांडाच्या पार्श्‍वभूमीवर आणि गुजरातमधील कथित विकासाच्या मॉडेलने चर्चेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात भाजप नेतृत्वाची माळ पडली.

दहा वर्षांच्या धोरण लकवा झालेल्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी ग्रासलेल्या युपीए सरकारला मतदार विटले होतेच; मोदींनी मतदारांना स्वप्ने दाखविली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशात मोदींची लाट आली. लोकसभेत प्रथमच भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले आणि नंतर विविध विधानसभा असोत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असोत; सर्वत्र भाजपची घोडदौड सुरूच राहिली. मोदींची लाट ओसरत नाही अशीच धारणा झाली होती.
सत्तेबरोबर दोषही निर्माण होत असतात. गेल्या चार दशकांत भाजपची वाटचाल सततचा विरोधी पक्ष ते सत्ताधारी पक्ष अशी अवश्‍य झाली आहे; तथापि काहीही करून निवडणुकीत विजय आणि सत्ता अशा मानसिकतेने भाजपच्या नेतृत्वाला ग्रासले आहे काय अशी शंका यावी अशी उत्तरांचल, कर्नाटक किंवा गोवा ही उदाहरणे आहेत.

हिंदुत्व ही भाजपची ओळख; तथापि राम मंदिर किंवा 370 वे कलम यावर भाजप आता फार बोलत नाही आणि विकास आणि हिंदुत्व वेगळे नाही असा दावा करीत असते; पण याचा एक अर्थ हिंदुत्व भाजपने सौम्य केले आहे का? असा प्रश्नही उत्पन्न होतो. आयाराम-गयाराम संस्कृती हा भाजपचा विशेष नव्हता; परंतु आता मात्र ही संस्कृती भाजपमध्ये सर्रास बोकाळली आहे आणि कार्यकर्त्यांवर त्यामुळे अन्याय होतो याचे सोयर-सुतक नेतृत्वाला राहिले आहे का? आक्रमकता आणि अभिनिवेश यातील फरक विसरून भाजपचे नेते विरोधकांवर शरसंधान करतात आणि शेलक्‍या शब्दांत टिप्पणी करतात. वाजपेयी आणि आडवाणी यांनी असे कधी केले नव्हते आणि तशा गोष्टींना भाजपमध्ये तेव्हा प्रतिष्ठा देखील नव्हती. ती आता मिळत आहे का? असा सवाल उठावा अशी परिस्थिती आहे. एकूण आपली सत्ता कायम राहणार अशीच भाजपची धारणा बनली आहे आणि अशी धारणाच नैतिक घसरणीस कारणीभूत असते.

भाजपचा विस्तार होत असताना विधिनिषेधाची बूज राखण्यात पक्ष कमी पडतो आहे, असेही आरोप होत असतात. आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमधून भाजप विरोध म्हणजे राष्ट्रविरोध नव्हे असे केलेले विधान भाजपच्या आताच्या नेतृत्वाच्या “आमच्यासह नाही तर राष्ट्रद्रोही’ अशा भूमिकेला चपराक लावणारे आहे. पण आडवाणी यांच्यासारख्यांना पक्षात मिळत असलेली वागणूक पाहता त्यांच्या या विधानाकडे किती गांभीर्याने पाहिले जाईल ही शंकाच आहे. एक खरे चाळिशीत पदार्पण करीत असताना भाजपने आत्मपरीक्षण केले पाहिजे. गेल्या वर्षीच्या अखेरीस तीन महत्त्वाच्या राज्यांत कॉंग्रेसची सत्ता आली. त्यापूर्वी कर्नाटकात कॉंग्रेस सत्तेत आली आणि गुजरातेत कॉंग्रेसने भाजपला घाम फोडला. राजकारण कधी कोणती कलाटणी घेईल हे सांगता येत नसते. चाळिशीत जवळचे कमी दिसू लागते असे म्हणतात. आपल्याला या दृष्टिदोषाने ग्रासलेले नाही ना? हे तपासून पाहण्यासाठी भाजपला चाळिशीत पदार्पण हे संयुक्‍तिक निमित्त आहे, असेच म्हणावे लागेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.