पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मागील आर्थिक वर्षात रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात कोणतीही वाढ न करता नोंदणी व मुद्रांक विभागाकडे दस्तनोंदणीतून तब्बल 50 हजार 500 कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा महसूल जमा झाला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात राज्यभरात 28 लाख 26 हजार 149 इतक्या दस्तांची नोंदणी झाली असून, मुद्रांक शुल्कापोटी हा महसूल मिळाला आहे.
राज्याला महसूल मिळवून देणारा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. राज्यातील शहरांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शहरांच्या हद्दीलगतच्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. यामुळे खरेदी- विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे.
जमीन, सदनिका आणि दुकाने यांच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क आकारले जाते. त्यातून मोठा महसूल जमा होतो, तसेच दोन व्यक्ती वा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, शेअरबाजार अशा विविध होणाऱ्या करांच्या नोंदणीतून नोंदणी विभागाकडे कर जमा होतो.
2023-24 या आर्थिक वर्षात राज्य शासनाने नोंदणी विभागाला 45 हजार कोटींचे महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, दि. 31 मार्च 2024 अखेरपर्यंत नोंदणी विभागाने उद्दिष्टाच्या 112 टक्के इतका महसूल संकलित केला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शनिवारी- रविवारी, तसेच इतर शासकीय सुटीच्या दिवशीही दस्तनोंदणीची दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवली होती. त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणी करता आली, तसेच यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी कमी होण्यास मदत झाली.
दस्त नोंदणीच्या संख्येत वाढ
2022-23 या आर्थिक वर्षात 44 हजार 681 कोटींचा महसूल मिळाला होता, तसेच 25 लाख 76 हजार 536 दस्त नोंदविले गेले होते, तर 2023-24 या आर्थिक वर्षात राज्यात एकूण 28 लाख 26 हजार 149 इतके दस्त नोंदविले गेले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षाची तुलना करता मागील वर्षी 2 लाख 49 हजार 613 इतकी जादा दस्त नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे.
महसूल संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले, तसेच मुद्रांक शुल्काच्या थकीत प्रकरणातील वसुली, अभय योजनेची प्रभावी अंमलबजावणी यामुळे मागील आर्थिक वर्षात 50 हजार 500 कोटी इतका विक्रमी महसूल नोंदणी व मुद्रांक विभागाकडे जमा झाला आहे. – हिरालाल सोनवणे नोंदणी महानिरीक्षक