अभिवादन : स्मरण एका राष्ट्रसेवाभावी नेतृत्वाचे!

-राहुल गोखले

भारतीय अर्थव्यवस्थेला ज्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात कलाटणी मिळाली आणि पूर्वीच्या समाजवादी अर्थव्यवस्थेकडून देशाने जागतिकीकरण आणि उदारीकरणाकडे वाटचाल सुरू केली अशा पी. व्ही. नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी वर्षाला नुकतीच सुरुवात झाली. वस्तुतः केवळ दिवंगत माजी पंतप्रधान म्हणूनच नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेला नवा ओनामा देणारे नेतृत्व म्हणून नरसिंह राव यांची जन्मशताब्दी अधिक उत्साहाने साजरी होणे आवश्‍यक होते…

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच कार्यक्रम आणि सोहळ्यांवर निर्बंध आले आहेत. तथापि, सामान्य वातावरण आणि परिस्थिती असती तरीही नरसिंह राव यांची जन्मशताब्दी अधिक उत्साहाने साजरी झाली असती का, हा प्रश्‍नच आहे. याचे एक कारण म्हणजे विद्यमान भारतीय जनता पक्षाचे राव हे नेते नव्हते. त्यामुळे सरकारी स्तरावर तेवढा उत्साह दिसलाही नसता. दुसरीकडे कॉंग्रेसने देखील नरसिंह राव यांची त्यांच्या उतारकाळात अवहेलनाच केली. तेव्हा त्या स्तरावर देखील उदासीनता असण्याची शक्‍यता अधिक होती. करोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेल्या अभूतपूर्व स्थितीमुळे तो अनुत्साह आणि ती उदासीनता लपली आहे एवढेच. मात्र, जनतेने तरी नरसिंह राव यांचे स्मरण करणे गरजेचे आहे. त्यांनी काही चुका आणि गफलती केल्या असतील देखील आणि असे कोणतेच नेतृत्व नाही जे निर्दोष असते. मात्र, त्याबरोबरच नरसिंह राव यांचे योगदानदेखील विसरता येण्यासारखे नाही. त्याकरिता देशाने त्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे.

नरसिंह राव यांच्या राजकीय कारकिर्दीचे तीन प्रमुख टप्पे करायचे ठरविले तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री व कॉंग्रेस संघटनेतील जबाबदाऱ्या आणि पंतप्रधानपद असे करता येतील. यापैकी प्रत्येक भूमिकेत त्यांनी काही योगदान दिले आहे आणि त्या त्या भूमिकेत असताना राजकीयदृष्ट्या काही भोगलेही आहे. आंध्र प्रदेशाच्या स्तरावर राव राजकारणात शिरले तेव्हा रामानंद तीर्थ कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होते नि त्यांचा प्रभाव राव यांच्यावर खूप होता. रामानंद तीर्थ हे वृत्तीने डावे होते. जमीन ही केवळ जमीनदारांच्या हातात असता कामा नये तर “कसेल त्याची जमीन’ या धोरणाचे ते पुरस्कर्ते होते. राव यांनी पुढे आंध्रमध्ये मुख्यमंत्री म्हणून जमीन सुधारणा कायदा जो राबविला त्याचे मूळ रामानंद तीर्थ यांच्या भूमिकेत नि त्यांचा राव यांच्यावर असणाऱ्या प्रभावात होते हे लक्षात येईल. हैदराबादमध्ये लष्करी कारवाईने निझामी राजवट संपुष्टात आली नि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राव यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती; पण कम्युनिस्ट उमेदवाराकडून ते पराभूत झाले.

पुढे 1956 मध्ये भाषिक निकषांवर राज्य पाहिजे यासाठी झालेल्या आंदोलनानंतर आंध्र प्रदेशची निर्मिती झाली. राव तेलंगणाचे. तेव्हा सीमांध्रच्या राजकारण्यांचा राव यांना विरोध होता हे ओघाने आलेच. अर्थात, तरीही विधानसभेवर निवडून गेलेले राव 1962 मध्ये पहिल्यांदा राज्यात मंत्री झाले. त्यांचे नाव नियोजित मंत्र्यांच्या सूचित सुरुवातीला नव्हते. पण मागास तेलंगणाला प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने राव यांचे नाव अखेरच्या क्षणी हाताने लिहिले गेले. राव पुढे नऊ वर्षे मंत्री होते नि निर्णय न घेणे हाच “निर्णय’ असा जो राव यांच्या कार्यशैलीवर आरोप होत आला त्याच्या अगदी विपरीत त्यांची ती मंत्रिपदाची नऊ वर्षे होती. उलट धडाकेबाज निर्णय घेणे हे त्यांच्या कारभाराचे व्यवच्छेदक लक्षण बनले.

1964 मध्ये ते हिंदू देवस्थान मंत्री होते तेव्हा अनियंत्रितपणे आणि पुजाऱ्यांच्या मर्जीवर चालणाऱ्या मंदिरांच्या प्रशासनाला त्यांनी शिस्त लावली. 1967 मध्ये ते आरोग्यमंत्री बनले. तेव्हा सरकारी रुग्णालयांना ते अचानक भेट देत आणि सरकारी डॉक्‍टरांच्या कामकाजावर नजर ठेवत. 1968 मध्ये ते शिक्षण खात्याचे मंत्री झाले तेव्हा त्यांनी खासगी महाविद्यालयांवर बंदी आणली नि सरकारी शाळांतील माध्यम सक्‍तीने तेलगू केले. तेव्हा राव यांची ही कार्यक्षमता अचंबित करणारी होती.

इंदिरा गांधी यांचा राव यांच्यावर इतका विश्‍वास होता की एका लेखकाने आपल्या पुस्तकात माहिती दिल्याप्रमाणे 1982 मध्ये राष्ट्रपती पदासाठी राव यांच्या नावाचा विचार केला होता. पण विशेषतः तमिळनाडूतील द्रविड पक्षांनी ब्राह्मण उमेदवारापेक्षा शीख उमेदवाराला पसंती दिली नि राव यांच्याबरोबर जे दुसरे चर्चेत होते ते झैलसिंग राष्ट्रपती झाले. पण राव यांनी कधीही निराशा वा नाराजी प्रकट केली नाही. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर अपघाताने नरसिंह राव यांच्याकडे पंतप्रधानपद आले. जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरण याला राव यांनी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या मदतीने गती दिली. अल्पमतातील सरकार राव यांनी पाच वर्षे तारेवरील कसरत करीत चालविले.

अर्थव्यवस्थेला गती देतानाच गुंतवणुकीसाठी देखील राव यांनी योगदान दिले. 1993 मध्ये राव यांनी दक्षिण कोरियाला भेट दिली. 1950-1960 च्या दशकानंतर कोरियाला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान होते. तेव्हा बोलताना राव यांनी कोरियन उद्योगांना भारतात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले. कोरियाच्या राजकारण्यांनाच नाही तर उद्योगपतींना ते भेटले. देवू वाहन निर्मिती उद्योगाच्या प्रमुखांना राव यांना भेटण्यात विशेष स्वारस्य होते. त्यांच्यात चर्चा झाली नि लवकरच भारतीय रस्त्यांवर देवू गाड्या फिरू लागल्या. नरसिंह राव यांना भारतातील आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार मानले जाते; पण बाबरी मशीद पाडली जाण्यापासून वाचवू न शकल्याने टीकेलाही तोंड द्यावे लागले.

नरसिंह राव यांचे आयुष्य हे चढ-उतारांनी भरलेले होते- वैयक्‍तिक नि राजकीयही. कधी उच्चपदावर तर कधी अज्ञातवासात याचा अनुभव त्यांनी वारंवार घेतला नि तरीही त्यांनी कॉंग्रेस सोडली नाही. झारखंड मुक्‍ती मोर्चा पक्षाच्या खासदारांना लाच देऊन आपले सरकार वाचविल्याचा आरोप राव यांच्यावर झाला नि कालांतराने त्यातून न्यायालयाने राव यांना निर्दोष सोडले तरी राव यांच्या प्रतिमेला तडे गेलेच. पण तरीही राव यांचे कर्तृत्व दशांगुळे वर उरतेच. तथापि, नंतर कॉंग्रेस नेतृत्वाचे त्यांच्याशी बिनसले. अनेक भाषांवर प्रभुत्व असणारा हा पंतप्रधान होता. तथापि, तरीही काही अंशी एकाकी आयुष्य जगला आणि एका अर्थाने मृत्यूनंतर देखील त्यांचे हे एकाकीपण संपले नाही.

जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना नरसिंह राव यांचे स्मरण हे त्यांच्या गुणसमुच्चयाला साजेसे व्हावयाला पाहिजे होते. सरकारी आणि पक्षीय स्तरावरील ही अनास्था करोनाच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या निर्बंधांमुळे आहे की, मुळातच ती उदासीनता आहे हे येणारा काळ सिद्ध करेलच. मात्र, भारतीय जनतेने नरसिंह राव यांच्या कारकिर्दीतील गफलतींपेक्षा त्यांच्या दीर्घकाळ केलेल्या देशसेवेचे आणि देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानासाठी स्मरण अवश्‍य केले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.