मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास सरकारमध्ये सुरु असलेल्या कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर आज (3 जुलै) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. ही बैठक जवळपास 1 तास सुरु होती. या बैठकीत सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाबाबत आणि राज्यातील करोनाच्या परिस्थीतीवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. ही बैठक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे झाली. याआधी महाविकास आघाडीतील नेत्यांच्याही भेटीगाठी झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही “सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती.
परस्पर लॉकडाऊन वाढवल्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर काल (2 जुलै) संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक झाली. यात लॉकडाऊन, राज्याच्या आर्थिक प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. आधी निर्णय प्रक्रियेबाबत कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची तशी भावना झाल्याने, महाविकास आघाडीतील कुरबुरी वाढल्याचे चित्र आहे.