मधुबनी – भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत माय-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात NH-104 चतुर्भुज पिपराही येथील आरडी कॅनॉल चौकाजवळ झाला आहे. अपघातग्रस्त बिहारमधील मधुबनी जिल्हातील आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुनीता देवी (35) व संजिला कुमारी (10) अशी मृत माय-लेकीची नावे आहेत. तर, दुर्गानंद पंडित असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुर्गानंदचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
पुनीता देवी व मुलगी संजिला उपचार करण्यासाठी दुचाकीवर रुग्णालयात जात होत्या यादरम्यान हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच लौकाहा पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मधुबनी येथे पाठवले. तर जखमी तरुणाला खुटाना सीएचसीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस करत आहेत.