नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल ( Bihar Election Results 2020 ) आज जाहीर होणार असून मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. आज दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण मतांच्या २० टक्के मतांची मोजणी करण्यात आली आहे. झालेल्या मतमोजणीच्या आधारावर भाजप-जेडी(यु) प्रणित एनडीएला बहुमत मिळताना दिसत असलं तरी मतमोजणीच्या संपेपर्यंत हेच चित्र कायम राहील याबाबत खात्री देता येणार नाही.
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर राजद-काँग्रेसच्या महाआघाडीने जोरदार ओपनिंग केली. मात्र ईव्हीएम मतांची मोजणी सुरु झाल्यानंतर हे चित्र पालटले. दुपारी १.३० पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ६० जागांवर दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांमध्ये केवळ १ हजार मतांचे अंतर आहे. ७ जागांवर तर हे अंतर १०० मतांहूनही कमी असल्याचं आकडेवारीतून समजतंय.
कांटे की टक्कर
दुपारी दीडच्या सुमारास कसबा सीटवरील लोजपाचे उमेदवार कॉंग्रेस उमेदवाराच्या केवळ ५ मतांनी पुढे होते, तर छपरा येथील आरजेडी उमेदवार भाजप उमेदवाराच्या 6 मतांनी पुढे होता. तसेच, मढौरामध्ये जेडी(यु) उमेदवार आरजेडी उमेदवारापेक्षा 10 तर सरायरंजनमधील जेडी(यु) उमेदवार आरजेडीपेक्षा 22 मतांनी पुढे होते.
शेखपुरा येथे जेडी(यु) आरजेडीच्या 48 मतांनी पुढे होती. नोखा येथे आरजेडी जेडी(यु) पेक्षा ३ मतांनी पुढे, ओबरा येथे आरजेडी एलजेपीपेक्षा ११३ मतांनी तर बेलागंजमध्ये आरजेडी जेडी(यु) च्या ११३ मते पुढे होती.