पुणे – कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढल्या नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना सुद्धा अभिजित बिचुकले यांनी आव्हान दिल. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीती त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली.
दरम्यान, सतत चर्चेत असणारे बिचकुले आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अभिजित बिचुकले कसबापेठ विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. स्वतः बिचकुले यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितलं आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर कॉंग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. तर, दुरीकडे भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे.