नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशहतवाडी कारवाया वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये भारतीय सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. याठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
काश्मीर झोनचे IG विजय कुमार यांनी याविषयीची माहिती दिली, चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यापैकी एक पाकिस्तानी दहशतवादी तुफैलही आहे. कुपवाडा येथील चक्रकंडी येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने नाकाबंदी सुरू केली. घेरल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले आणि 2 दहशतवाद्यांना ठार केले. या भागात अजूनही दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.
काश्मीर झोनचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, एलईटीचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यात पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही हात असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.
याआधी सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला, तर तीन दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल, 5 मॅगझिन आणि अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.