पाचगणी -करोनाला थोपविण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी आदेश असतानाही भिलार (ता. महाबळेश्वर) येथील रेशनिंग दुकानासमोर धान्य खरेदीसाठी कार्डधारकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
जगभरासह देशात विशेषत: महाराष्ट्रात करोनाने थैमान घातले आहे. करोनाला रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व लहान मोठे उद्योग व्यवसायही बंद आहेत. देशभरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातही करोनाचे 90 रुग्ण झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातही प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यास त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र तरीही भिलार येथे बुधवारी रेशनिंग दुकानासमोर कार्डधारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी नागरिक घोळक्याने एकत्र जमा झाले होते. शासनाने लागू केलेल्या जमाव बंदीचा आदेश झुगारुन तसेच सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडवत सुमारे अडीचशे ते तीनशे कार्डधारकांनी यावेळी गर्दी केली होती. विशेष म्हणजे जबाबदार व्यक्ती असणाऱ्या ग्रामपंचायतीचे सदस्य आपल्या भोवती घोळका करुन बसले होते. त्यांच्या या बेजबाबदार वागण्याची सूज्ञ नागरिकांमधून चर्चा सुरु आहे.