पुण्यात करोना बाधितांना लुटणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सला दणका

88 लाख 76 हजारांची 'लूट' परतवली : तक्रार करण्याचे आवाहन

पुणे – कोविड -19 च्या रुग्णांवर उपचार करताना आकारल्या जाणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांवर महापालिकेने चाप बसवला आहे. जादा बिल आकारल्यास जागेवरच ऑडिट करून बिलांची रक्कम कमी करण्यात येत आहे. आजपर्यंत सुमारे 88 लाख 76 हजार 576 रुपयांची बिलांची रक्कम महापालिकेने रुग्णालयांना कमी करायला लावून आणि ती रुग्णांना परत करून नागरिकांना दिलासा दिला आहे.

 

करोना बाधिताला दाखल करतानाच 40-50 हजार रुपये भरण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते. याशिवाय अन्य बिले भरण्यासाठीही तगादा लावला जातो. रुग्णाला ऍडमिट करतानाच खिशात 40 हजार ठेवावेच लागतात. याशिवाय रुग्ण बाहेर पडताना त्याचे बिल दीड-दोन लाख रुपयांच्या घरात जाते. त्यामुळे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. यासंबंधी अनेक तक्रारी आल्यानंतर महापालिकेने अशा रुग्णालयांवर ऍक्शन घेत, वाढीव बिलांना चाप लावला आहे.

 

महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी या संदर्भात माहिती दिली. दीड लाख रुपयांपेक्षा अधिक बिल आकारल्याच्या अनेक तक्रारी आल्या. दि.14 ऑगस्टपासून या बिलांची तपासणी करण्याला सुरूवात केली. दि.9 सप्टेंबरपर्यंत सुमारे 311 तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या होत्या. यापैकी 186 तक्रारींमध्ये खाजगी हॉस्पिटलकडून तब्बल 5 कोटी 45 लाख 985 इतकी मूळ बिलाची रक्कम आकारण्यात आली होती. या सर्व बिलांची डॉक्टर आणि ऑडिटरच्या टीमकडून तपासणी करण्यात आली.

 

खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करताना संबंधित हॉस्पिटलकडून पीपीई किट, औषध खरेदी, बेड चार्जेस, डॉक्टरांची फी आदी बिले लावली जातात यामध्ये उपचाराचा खर्चही वेगळा असतो या सगळ्याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने स्वत:ची एक डॉक्टर आणि ऑडिटरची टीम तयार करून, अशा बिलांची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले. हॉस्पिटलने दिलेले बिल योग्य आहे का, याची तपासणी सुरू केली त्यातून लाखो रुपयांची बिले कमी करण्यात आली. अजूनही कोणाच्या तक्रारी असतील, तर त्याची चौकशी केली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.