पुणे – 16 ऑक्टोबरपासून 30 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 15 दिवस पुणे विमानतळावरील प्रवासी उड्डाणे बंद राहणार आहेत. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी विमानतळ बंद ठेवण्यात येणार असून या काळात प्रवाशांना हवाई प्रवासासाठी पूर्णपणे मुंबई येथील विमानतळावर अवलंबून रहावे लागणार आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. तेव्हापासूनच लोहगाव वरून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे जवळपास वर्षभर लोहगाव वरून केवळ दिवसाच उड्डाणे होत आहेत. आता ती देखील बंद होणार आहेत.
16 ऑक्टोबरला सकाळपासून 30 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विमानतळ प्रशासनाच्या या निर्णयामुळे आधीपासून बुकिंग असलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.