कामशेत – गणेशोत्सवाचा उत्साह जसजसा वाढतोय तसतशी मोदकांची मागणीही वाढत असून, त्यातही उकडीचे मोदक चांगलाच भाव खात आहेत. त्यामुळे उकडीच्या मोदकांबरोबरच स्वीट मार्टमधील विविध रूचकर स्वादाच्या मोदक विक्रीतूनमोठी आर्थिक उलाढाल होत आहे. तर उकडीचे मोदक बनविणाऱ्या अनेक गृहिणींना व महिला बचत गटांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
गणरायाचे आवडते खाद्य म्हणजे मोदक. कोकणात प्रसिद्ध असलेल्या उकडीच्या मोदकांची मागणी उर्वरित महाराष्ट्रातदेखील वाढत आहे. गणेशोत्सवातील वाढत्या मागणीमुळे उकडीच्या मोदकांनी गृहिणींना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला असून, काही महिला मिठाईच्या दुकानांनादेखील या मोदकांचा पुरवठा करीत आहेत. मिठाईच्या दुकानांमध्ये मोदकांचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. त्यात चॉकलेट, काजू केशर, गुलकंद, राजभोग, पिस्ता, मॅंगो आणि इतर मोदकांचा समावेश आहे.
पारंपरिक पद्धतीच्या उकडीच्या मोदकांना यंदाही मोठी मागणी आहे. उकडीचे मोदक हा अत्यंत कुशलतेने बनवायचा पदार्थ असल्याने अनेकांचा कल ते रेडिमेड आणण्याकडे वाढत आहे. त्यामुळेच मावळातील शहरी भागात गणेशोत्सवात उकडीचे मोदक तयार करून विकणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. गणेशोत्सवात आतापर्यंता देहूरोड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, खंडाळा, कामशेत, वडगाव मावळ, पवनाननगर या भागात हजारो उकडीच्या मोदकांची हातोहात विक्री झाली आहे. यामधून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
कोकणात प्रामुख्याने मुबलक प्रमाणात तांदूळ आणि नारळाचे उत्पादन होत असल्याने उकडीचे मोदक तेथील पारंपरिक पदार्थ आहे. तेथे दर महिन्याच्या चतुर्थीला गणरायाला उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखविण्याची प्रथा आहे. गूळ, खोबरे, खसखस, जायफळ, वेलची यांचे सारण आणि इंद्रायणी व आंबेमोहर तांदळाची पिठी यापासून उकडीचे मोदक तयार करण्यात येतात.
उकडीच्या मोदकाची किंमत अधिक
उकडीच्या मोदकांची किंमत 21 रुपये ते 51 रुपये प्रतिनग आहे. त्यात सुकामेवा आणि केशरयुक्त मोदकांचा समावेश आहे. काही मोदकांसोबत तुपाचे पाकीटदेखील दिले जाते. अनेक गृहिणी, कुटुंबीय सोशल मीडियावर आपल्या मोदकांची जाहिरात करत आहेत. “माऊथ पब्लिसिटी’सह फूड डिलिव्हरी ऍपचाही मोठा वापर केला जात आहे.
आम्ही मागणीनुसार मोदक पुरवितो. गणेशोत्सवादरम्यान आम्ही दररोज शंभरहून अधिक मोदकांचे उत्पादन करतो. हे मोदक बनविणे वेळखाऊ प्रक्रिया आहे. गणेशोत्सवात मोदकांना मागणी वाढली आहे. त्यामुळे महिलांना रोजगार निर्माण झाला आहे.
– सुदर्शना जाधव,राजमुद्रा महिला बचत गट, कामशेत.