न्यूयॉर्क : सूर्य सौरमालेतील मुख्य ऊर्जा स्त्रोत आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर सौर ज्वाळामुळे स्फोट होतात. गेल्या चार वर्षांतील सूर्याच्या पृष्ठभागावर हा सर्वात मोठा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट ‘AR 2838’ नावाच्या सनस्पॉटवर झाला आहे. AR 2838 हा आतापर्यंतचा चार वर्षांतील सर्वात मोठा सोलर फ्लेअर स्फोट असल्याचे मानले जाते. या स्फोटाला X1.5 श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. या सौर स्फोटाकडे नवीन सौरचक्र म्हणून पाहिले जात आहे.
सूर्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला हा सनस्पॉट होता, त्यावर स्फोट झाला. येत्या काही आठवड्यांत हा सनस्पॉट जागा बदलण्याचीही शक्यता आहे. हा सनस्पॉट काही काळ त्याच जागी राहिला तर तो पृथ्वीवरूनही दिसू शकतो. अटलांटिक महासागरावरील शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउटमुळे पृथ्वीवरील सौरवादळाचे परिणाम जाणवले.
सौर ज्वाळांमुळे मशीन्सचे नुकसान होते. तसेच पृथ्वीवरील विद्युत प्रवाह रोखण्यातही सौर ज्वाळांचा परिणाम होतो. एका रिपोर्टनुसार, सौर ज्वाळांमुळे पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात वरच्या थराचे आयनीकरण झाले, ज्यामुळे विद्युत प्रवाह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 60-100 किमी दरम्यान वाहू लागला. परिणामी, पृथ्वीचे ध्रुवीय चुंबकीय क्षेत्र बदलले.
सौर ज्वाळा पृथ्वीच्या दिशेने आल्यास याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. या सौर ज्वाळामुळे ज्वालामुखी आणि रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड्स, GPSवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अंतराळयान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.