मुंबई – एकनाथ शिंदे सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे.
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार 1 जुलै 2023 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 42 वरुन 46 टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ 1 जुलै 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबरच्या वेतनासह रोखीने देण्यात यावी, असा निर्णय सरकारने घेतला आहे. एक जुलै 2023 पासुनची महागाई भत्त्याची थकबाकीही मिळणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज अर्थ विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याआधी 30 जून 2023 रोजी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती.