उपचारासाठी माणिकडोह निवारण केंद्रात केले दाखल
आळेफाटा – नगर-कल्याण महामार्गावर पिंपळवंडी गावच्या हद्दीत रविवारी (दि. 3) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिल्यामुळे हा बिबट्या गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी माणिकडोह येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपळवंडी गावच्या हद्दीमधील वाळुंजवाडी येथे मुक्ताईदेवीच्या मंदिराजवळ नगर कल्याण महामार्ग पार करत असताना एका अज्ञात वाहनाची धडक बसून हा बिबट्या गंभीर जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर काही नागरिकांनी या जखमी झालेल्या बिबट्याला पाहिल्यानंतर या घटनेची माहिती वनखात्याला कळविण्यात आली. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी या बिबट्याची तपासणी केली व त्यास तातडीने वनखात्याच्या वाहनात घालून पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे
बिबटे असुरक्षित –
जुन्नर तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने हा तालुका बिबट्या प्रवणक्षेत्र असलेला तालुका आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. तर माणसांवरही हल्ले झाले आहेत. बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे आता बिबट्यांचेही अस्तित्वही धोक्यात आले आहे. यापूर्वी अनेक बिबटे विहीरीत पडलेले आहेत. तर काही बिबट्यांचा महामार्ग पार करताना मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या बिबट्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाय योजना करण्याची गरज असल्याचे प्राणी मित्र संघटनेची मागणी आहे.