बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्याने गुलाल-भंडाऱ्याची उधळण, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
मावळ – बैलगाडा शर्यतीवरील असणारी बंदी सुप्रीम कोर्टाने सशर्त उठविल्याने मावळ तालुक्यातील गावागावांत गुरुवारी (दि. 16) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बैलगाडा शौकीन, गाडामालकांनी ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र येत गुलाल-भंडाऱ्याची उधळण करीत एकमेकांना पेढे वाटून उत्सव साजरा करण्यात आला. गावागावातील शर्यतींमध्ये पळणाऱ्या बैलाची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.
बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने वेहरगाव येथे जल्लोष कार्ला – मराठी मातीतील बैलांचा अस्सल रोमांचक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत ही शर्यत गेल्या सात वर्षांपासून बंद होती. बैलगाडा मालक आतूरतेने बैलगाडा सुरू होण्याची वाट पाहत होते. महाराष्ट्रात वारकऱ्यांना आवड असते. पंढरीच्या वारीची तर बैलगाडा शौकीनांना आवड असते. बैलगाडा शर्यतीला कोर्टाने हिरवा कंदील दिल्याने कार्ला-वेहरगाव एकवीरा देवी पायथ्याशी बावऱ्या पक्ष्या ग्रुप (एकवीरा, पुणे) यांनी डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक काढत गुलाल व भंडारा उधळत पेढे वाटत जल्लोष करण्यात आला.
या निकालामुळे आता ग्रामीण भागात जत्रा हंगामात हुर्रर्र झाली, अशी आरोळी घाटात घुमणार असल्याने परिसर दुमदुमून निघणार आहे. अनेक वर्षांची परपंरा असणारा व पिढ्यान्पिढ्या चालणारा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवडता खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत परंतु कोर्टात या शर्यत बंद करण्यासाठी याचिका दाखल झाल्याने कोर्टाने मे 2014 साली कोर्टाने शर्यत बंद केली होती. ही सुरू करण्यासाठी अनेक आंदोलने देखील झाली परंतु शर्यत सुरु झाली नाही व बैलगाडा शौकीनांची निराशा झाली होती.
अनेक वर्षांपासून ज्या बैलगाडा शर्यत सुरू करण्याची प्रतीक्षा शेतकरी राजा करत होता ती आज सुरू झाल्याने आनंद उत्सव साजरा करत पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने आपल्याच पक्षाच्या पाठपुराव्यामुळे ही शर्यत सुरू झाली श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली असल्याचे देखील आज सोशल मीडियावर दिसले.
पवनमावळात बैलांची मिरवणूक
पवनानगर :गेल्या सात वर्षांपासून न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत बंद होती. आज अखेर न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. पवनानगर येथे न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तसेच मुख्य बाजारपेठेतून गोठ्यातील गाडा व बैलांची भंडारा उधळून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. पवनमावळातील गाडा मालकांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.
बैलगाडा शौकीनांचा जल्लोष
टाकवे बुद्रुक : गेल्या सात वर्षांपासून न्यायालयांच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत बंद होती; परंतु राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे अखेर न्यायालयाने बैलगाडा शर्यतला परवानगी दिली. न्यायालयाच्या निर्णयाचा आपल्या गोठ्यातील गाडा बैलांची टाकवे येथील मुख्य बाजारपेठेतून डीजे लावून भंडारा उधळून मिरवणूक काढण्यात आली. तसेच सर्व बैलगाडा शौकीन यांना लाडू भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा बैलगाडा विमा संघटनेचे माजी अध्यक्ष नंदुशेठ असवले, मावळ तालुका बैलगाडा संघटना माजी संचालक विलास असवले, नवनाथ आंबेकर, माजी संचालक नंदकुमार असवले, भूषण असवले, अजिंक्य असवले, अक्षय असवले, शिवाजी जांभुळकर, सुनील आंबेकर, भरत असवले, रमेश असवले, दशरथ कोठावळे, विक्रम असवले, अर्जुन गुणाट, सोमनाथ जगताप, दत्ता आबेकर, चंद्रकांत जगताप, राजू नाणेकर, शरद कोंडे, शिवराज असवले, अजय शिंदे यासह गाडामालक, बैलगाडा शौकीन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुलाल भंडाऱ्याची उधळण,
पेढे वाटून आनंदोत्सव
चांदखेड – बैलगाडा शर्यतीवर असणारी बंदी सुप्रीम कोर्टाने सशर्त उठविल्याने चांदखेड परिसरातील कुसगाव, पाचाणे, पुसाणे, दिवड आढले, ओवळे आदी गावांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बैलगाडा शर्यतीची आवड असणाऱ्या पुसाणे गावातील बैलगाडा मालक व बैलगाडा शौकिनांनी ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र येत गुलाल भंडाऱ्याची उधळण करित एकमेंकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. गावातील शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलाची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.
बैलगाडा शर्यतीवर बंदी असण्याच्या काळात देखील येथील बैलगाडामालकांनी आपली बैल सांभाळून त्यांच्यावर खुराक, खाद्यासाठी लाखो रुपये खर्च करीत होते. बैलांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून त्यांचे वाढदिवस तसेच अंत्यविधी व दशक्रिया विधी सारखे सुख-दुःखाचे कार्यक्रम साजरे केले जात होते. त्यामुळे बंदी उठल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.