“भामा’ आली हो अंगणी…!

भामा-आसखेडचे पाणी तीन दिवसात पुण्यात; शनिवारपासून 10 दिवसांची चाचणी

 

पुणे – शहराच्या पूर्वभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून तब्बल 8 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या भामा-आसखेड योजनेचे पाणी अखेर नगररस्ता परिसरात पुढील चार दिवसांत पोहोचणार आहे. या योजनेसाठीची पुण्यातील जलवाहिन्यांची चाचणी येत्या शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे.

पुढील दहा दिवस ही चाचणी सुरू राहणार असल्याची माहिती वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिली. तर, चाचणीनंतर पुढील काही आठवड्यात उद्‌घाटनानंतर लगेच या योजनेचे पाणी नगरस्ता आणि परिसरास मिळणार आहे.

महापालिकेकडून तब्बल 380 कोटी रुपये खर्चून ही योजना साकारण्यात आली. त्यात भामा-आसखेड धरणातून शहराच्या पूर्वभागासाठी सुमारे 2.64 टीएमसी पाणी वर्षभरासाठी दिले जाणार आहे. ही योजना तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र भामा-आसखेड धरणग्रस्तांचे न्याय पूनर्वसन आणि मागणीसाठी वारंवार या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

ही आंदोलने जवळपास तीन ते साडेतीन वर्षे चालल्याने ही योजना रखडली होती. अखेर ही मार्गी लागली असून या योजनेतील 42 किलोमीटरच्या मुख्य जलवाहिनीसह इतर सर्व कामे पूर्ण झाली आहेत. तर, जॅकवेलपासून टप्प्याटप्प्याने जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची चाचणी पूर्ण झाली आहे.

आता शेवटच्या टप्प्यात नगररस्ता परिसरात उभारलेल्या पाण्याच्या टाक्‍या तसेच या योजनेसाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांच्या चाचण्या पुढील दहा दिवस केल्या जाणार असल्याचे आमदार टिंगरे यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.