नवी दिल्ली – वाहनाचालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवल्यामुळे अपघात होतात. त्यासाठीच आपण महामार्गांवर मद्य पिऊन वाहन चालवू नका असे फलक लावतो. मात्र पंजाबचे मुख्यमंत्री दारू पिऊन राज्यच चालवत आहेत. किमान भगतसिंह यांची पगडी घातल्यावर तरी असे प्रकार करू नका अशी खरमरीत टीका अकाली दलाच्या नेत्या खासदार हरसिमरत कौर यांनी संसदेत केली.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मद्याच्या प्रभावाखाली असतात असे कायम बोलले जाते व त्याबद्दल चिंताही व्यक्त केली जाते. स्वत: मान यांनीही विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपण दारूला स्पर्श करणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र मंगळवारी लोकसभेत याच विषयावर चर्चा करत खासदार हरसिमरत कौर यांनी मान यांच्यावर टीका केली. ज्या राज्याचा मुख्यमंत्रीच असा असेल तर त्या राज्याची स्थिती कशी असेल याचा कोणीही अंदाज बांधू शकतो असे त्या म्हणाल्या.
हरसिमरत कौर म्हणाल्या की काही महिन्यांपूर्वी आमचे मुख्यमंत्री संसदेतही मद्यसेवन करून यायचे. त्यांच्या शेजारी बसणाऱ्यांनी आपली जागा बदलून देण्याची मागणी केली होती व तशा तक्रारीही केल्या होत्या. त्यानंतर मान यांच्या विरोधात एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती व समितीच्या शिफारसीनंतर मान यांना सभागृहातून बाहेरही काढण्यात आले होते.
एका जुन्या घटनेचा संदर्भ देताना कौर म्हणाल्या की 2014-15 मध्ये मी सभागृहाची सदस्य होती व त्यावेळी मान यांना भेटली तेव्हा त्यांच्या आजुबाजूला दारूचाच वास येत होता. भगतसिंग यांची पगडी घातल्यानंतर असे करू नका असे त्यांना सांगा असे आपण आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनाही सांगितले होते. त्यावेळी मान यांनी मला ट्वीटरवर ब्लॉक केले होते.