कुडाळला अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून रॅलीचे आयोजन
कुडाळ -“मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’, “बेटी बचाव, बेटी पढाव’,च्या घोषणांमध्ये कुडाळ (ता. जावली) येथे निघालेली बेटी बचाव जनप्रबोधन रॅली लक्षवेधी ठरली. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जावली यांच्यावतीने कुडाळ बीट अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा शुभारंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचायत समितीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आला.
गटविकास अधिकारी सतीश बुध्दे म्हणाले, कुडाळची ही बेटी बचाव रॅली संपूर्ण जिल्ह्याला प्रेरणा देणारी ठरेल, तर मुलींचा जन्मदर वाढत नाही तोपर्यंत अशा जनजागृतीचे व समाजप्रबोधनाचे कार्य पंचायत समितीच्या विविध विभागांमार्फत सुरू राहिल असे सांगितले. पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे म्हणाले, मुलींच्या जन्माचा सन्मान करावा, बेटी बचाव अभियान समाजातील सर्व स्तरात रुजविणे काळाची गरज आहे.
यावेळी सर्वांनीच अभियानास सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच “मी गाव व तालुका पातळीवर गर्भलिंग परिक्षण होऊ देणार नाही, मी मुलींच्या जन्मास प्रवृत्त करणार व त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार’ अशी सर्वांसमक्ष शपथ घेण्यात आली. कार्यक्रमास माजी सभापती सौ. अरूणा शिर्के, वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. निकम, पयर्वेक्षिका सौ. प्रेरणा कठाळे, यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
रॅलीत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात विविध संदेश व घोषणांचे फलक घेतलेले होते. बेटी बचाव रॅलीत विविध महानायिकांच्या लक्षवेधी वेशभूषेत राजमाता जिजाऊ सौ. प्रतिभा पाटील, झाशीची राणी, मदर तेरेसा, किरण बेदी, इंदिरा गांधी, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आदी महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. रॅलीचा प्राथमिक आरोग्य केंद्र ते बस स्टॅंड, बाजारपेठ ते अंगणवाडी शाळा प्रांगण येथे समारोप करण्यात आला.