कोलकाता – पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी शुक्रवारी सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 3.21 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महसुली प्राप्ती रु. 1 लाख 98 हजार 47 कोटी एवढी आहे, तर राज्य सरकारने विविध विकास कामांच्या खर्चासाठी 1 लाख 14 हजार 958 कोटी रुपयांचे सार्वजनिक कर्ज उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
नवीन आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्च 33,144 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे आणि महसुली खर्च 2 लाख 26 हजार 326 कोटी रुपये अपेक्षित आहे. या अर्थसंकल्पात बॅटरीवर चालणाऱ्या आणि सीएनजीच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना दोन वर्षांसाठी नोंदणी शुल्क आणि रस्ता करातून सूट देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. वाहनचालकांनी वाढत्या इंधन महागाईचा सामना करणे मुष्किल झाले असताना त्यांना त्यातून काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न या सरकारने या सवलतीद्वारे केला आहे.