मुंबई – दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तांच्या व्यवहारात कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपावरून अटक करण्यात आलेले अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल आता मंगळवारी लागणार आहे.
मलिक यांनी आपली अटक ही बेकायदा असल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. मंगळवारी सकाळी 10.30 वाजता न्यायालय आपला निकाल देईल.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मलिक यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मलिक यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयात मलिक यांची बाजू ऍड. अमित देसाई यांनी मांडली. तर ईडीकडून मलिक यांची अटक ही कायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला असून येत्या मंगळवारी निकाल जाहीर करणार आहे.
याआधी मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक करून आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. मलिक यांना 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, गुरुवारी ईडीने मलिक यांची अटक कायदेशीर असल्याचा दावा उच्च न्यायालयात केला. मलिक यांनी अटकेला आव्हान देण्याऐवजी नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे मत ईडीने न्यायालयामोर मांडले. त्याचबरोबर मलिक यांची याचिका सुनावणी योग्य नसल्याचा दावा करत ती फेटाळण्याचीही मागणी ईडीने उच्च न्यायालयासमोर केली होती.