बीड : दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा बीडमधील भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने येथे कार्यकर्ते हजर राहत असतात. यातच आता पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहे. त्यादृष्टीने आता यंदाच्या या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे कोणत्या मुद्यांवर भाष्य करणार याकडे स्वरांचे लक्ष लागले आहे. मात्र दसरा मेळावा होण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर समर्थकांना आवाहन केले आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्वीटवर (एक्स) व्हिडिओ शेअर करत म्हंटले की, “दरवर्षी प्रमाणे तुम्ही मोठ्या संख्येने उत्साहात दसऱ्याला येणार आहात. पण तुमच्यावर प्रेम करणारी तुमची ताई म्हणून मला काळजी वाटते. मी तुम्हाला काही सूचना करणार असून त्याचे पालन करा.”
दसरा मेळावा 2023 निमित्त विनम्र आवाहन !!#AaplaDasara #AapliParampara #BhagwanBhaktigad #Sawargav #आपला_दसरा_आपली_परंपरा pic.twitter.com/v5QZB3gii4
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 23, 2023
पंकजा मुंडे यांनी केल्या अशा सूचना
- घरातून निघताना खाण्याच्या वस्तूसोबत आणा. ग्लुकोजची बिस्किटे, मिठाची बरणी, साखरेची बरणी आणि पाण्याच्या बाटल्याही सोबत आणा.
- डोक्यावर ठेवण्यासाठी गमछा, पंचा, उपरणं तुमच्यासोबत ठेवा. मुलांनी टोपी ठेवावी.
- अतिवेगाने गाडी चालवू नका. घरातून वेळेवर किंवा वेळेच्या आधी निघा. घाई करू नका.
- दुचाकीवरून येणाऱ्यांनी सेल्फी, फोटो, व्हिडीओ घेण्याच्या नादात चुकीच्या पद्धतीने वाहने चालवू नका,
व्हिडिओच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी पार्किंगबाबत देखील कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. गडावर पोहोचल्यानंतर लोकांना त्रास होणार नाही, अशा ठिकाणी वाहने पार्क करा. इतरांनाही पार्किंगसाठी जागा मिळेल, याची खबरदारी घ्या. तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही याचीही काळजी घ्या. पार्किंगच्या जागीच गाडी पार्क करा. अन्यथा वाहतुकी कोंडीचा तुम्हालाच सामना करावा लागेल.