चंदीगड – पंजाबमधील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एका महिलेसह आम आदमी पक्षाच्या दहा आमदारांचा शनिवारी येथे समावेश करण्यात आला. पंजाब भवन येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी 10 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सर्वांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली.
हरपाल सिंग चीमा आणि गुरमीत सिंग मीत हैर वगळता इतर आठ आमदार पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. मात्र भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळात हत्येचा आरोप असलेल्या आमदाराला देखील मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.
अजनाला मतदार संघातून आमदार झालेले कुलदीप सिंह धालीवाल सात वर्षांपासून आम आदमी पक्षासोबत आहेत. ते बागवान आहे. मात्र धालीवाल यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे.
2019 मध्ये राजा सांसी पोलिस ठाण्यात कुलदीप सिंह धालीवाल यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी उच्च न्यायालयातून जामीन घेऊन चौकशीची मागणी लावून धरली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी आजपर्यंत त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर केलं नाही.
कुलदीप धालीवाल यांनी निवडणूक प्रचारात भामुक्त अजनाला असा नारा दिला होता. तसेच सत्तेत आल्यास एकाही दुकानदाराला त्रास होणार नाही आणि संपूर्ण अजनाळा सुटकेचा नि:श्वास टाकेल, अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली.