बारामती (प्रतिनिधी) : बेसबॉल मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे कर्णधार असलेल्या बारामतीच्या रेश्मा पुणेकरला महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला असून तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पुरस्कारासाठी ३० जून रोजी संपणारे वर्ष धरून त्या पूर्वीच्या पाच वर्षां पैकी तीन वर्षांमध्ये त्या खेळाडूने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर केलेल्या कामगिरीचे व क्रीडानैपुण्याचे मूल्यमापन केले जाते. ग्रामीण भागामधून देशाचं कर्णधार पद स्वीकारून प्रतिनिधित्व करणारी रेश्मा पुणेकर घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आजपर्यंत तब्बल दोन आंतरराष्ट्रीय सामने, चीन आणि हॉंगकॉंग या देशामध्ये यांनी खेळलेले आहेत. 23 राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 28 राज्यस्तरीय सामने तसेच 04 सुवर्ण पदक, 06 रजत पदक, तीन कास्य पदक आणि रागिणी पुरस्कार, राज्यस्तरीय खेलरत्न पुरस्कार, सरदार धुळोजी मोरे वीरता पुरस्कार अश्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आहेत.
आज पर्यंत रेशमाचा तब्बल बारा वर्षांचा खेळरूपी प्रवास हा ग्रामीण भागातील नव तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तिने केलेली प्रचंड मेहनत कष्ट यामुळेच रेश्मा केवळ बारामतीच नव्हे तर देशाचे नाव बेसबॉल या खेळामध्ये उंचावत आहे याचा सार्थ अभिमान बारामतीकरांना वाटतो.
सध्या रेश्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील शारीरिक शिक्षण विभागात एम. पी. एड पदवी अभ्यास करत आहेत .ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय खेळाडूला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोच्च शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ज़ाहिर झाल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.