सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील सोरटेवाडीत गव्याचे दर्शन झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. सलग दोन दिवस गवा दिसल्याने त्याची गावात भलतीच चर्चा रंगली त्यानंतर सरपंचांनी वनविभागला कळवले तर ठशावरून तो गवाच असल्याचे वनरक्षकाने सांगितले.
सोरटेवाडी येथे रविवारी (दि. 14) सायंकाळी आणि सोमवारी (दि. 15) सकाळी रानगवा दिसल्याने सरपंच दत्तात्रय शेंडकर यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला.
वनविभागाचे वनरक्षक योगेश कोकाटे, वनकर्मचारी नंदकुमार गायकवाड, दादा जाधव, पिंटू शेलार यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत पायाचे ठसे पाहून हा रानगव्याच्या पायाचे ठसे असल्याचे स्पष्ट केले आहे.
तर रानगव्या पासून कोणताही धोका नसल्याचे वनरक्षक योगेश कोकाटे यांनी स्पष्ट केले असले तरी नागरिक कमालीचे घाबरलेल आहेत.
सोरटेवाडीत पायाचे ठसे आढळले : कोणताही धोका नसल्याचे वनरक्षकांचे म्हणणे
…अन् पुणेरी गव्याची आठवण
काही महिन्यांपूर्वी पुण्यात गव्याचे दर्शन झाले होते. तर सुटका करताना पळून पळून एका गव्याचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर पुन्हा गव्याचे दर्शन झाल्यावर त्याची सुटका करून त्यास वनहद्दीत सुखरूप सोडले होते याची आठवण यानिमित्ताने बारामतीकरांना झाली.