नवी दिल्ली – ओमायक्रॉनमुळे संसर्ग वाढत असताना बॅंकिंग सेवा देणाऱ्या बॅंक कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाइन वर्कर समजावे आणि त्यांना करोना लसीचा बूस्टर डोस देण्यास प्राधान्यक्रम द्यावा असे बॅंक अधिकाऱ्याच्या संघटनेने म्हटले आहे. या संघटनेने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठविलेल्या पत्रात सांगितले आहे की, याअगोदर करोना लाटेमध्ये अनेक बॅंक कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला. त्यावेळी 2,000 कर्मचारी मरण पावले.
ओमायक्रॉनची लाट ओसरेपर्यंत बॅंकेतील कामकाजाचा कालावधी कमी करून आठवड्याला पाच दिवस करण्याच्या शक्यतेवरही विचार करण्यात यावा. बॅंकांमध्ये पूर्ण क्षमतेने कर्मचाऱ्याची उपस्थिती न ठेवता 50टक्के कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम करून घेण्याची गरज आहे.त्यामुळे संसर्ग कमी होईल.
बॅंक कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश दिला जावा. त्यामुळे त्यांना कार्यालयात जाताना अडचणी येणार नाहीत. 10 जानेवारीपासून 60 वर्षावरील व्यक्ती तसेच आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. यामध्ये बॅंक कर्मचाऱ्यांनाही समाविष्ट केले जावे. बॅंकांतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी.
आम्ही देशाचे आर्थिक सैनिक आहोत. बॅंक कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाइन वर्कर्स असे संबोधले जावे अशी मागणी यापूर्वी अनेक वेळा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपले जीवन गमवावे लागले आहेत असे या संघटनेने म्हटले आहे.