मेलर्बन – ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोवीचला लसीकरणातून सूट देण्यात आली आहे. तसेच नोवाकची डिसेंबरमध्येच कोविड चाचणी झाल्याने त्याला विशेष सवलत देण्यात आली, अशी माहिती जोकोविचच्या वकिलांनी शनिवारी न्यायालयात दिली.
ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत सहभागासाठी तो बुधवारी मेलबर्न येथे दाखल झाला. मात्र, विमानतळावरच त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. या प्रकरणी न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी जोकोविचच्या वतीने वकिलांनी युक्तीवाद करताना सांगितले की, ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये खेळण्यासाठी लसीकरणातून वैद्यकीय सूट मिळाल्यानंतरच जोकोविच येथे आला आहे.
त्याने वैद्यकिय कारणांमुळे लस घेतलेली नाही. तसेच 16 डिसेंबर 2021 रोजी त्याची कोविड पीसीआर चाचणीही करण्यात आली होती. यामुळे जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयात केली.
दुसरीकडे चेक प्रजासत्ताकची खेळाडू रेनाटा व्होराकोव्हाचाही व्हिसा शुक्रवारी रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, टेनिस ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरियन राज्य सरकारने सांगितले होते की, जोकोविचसह आणखी 26 अर्जदारांनी लसीकरणाशिवाय ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यासाठी अर्ज केला होता.
जोकोविचच्या समर्थनार्थ निदर्शने
अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोवीचचा व्हिसा रद्द केल्याने रण पेटले असून जोकोवीचच्या समर्थनार्थ निदर्शने होत आहे. तसेच त्याला महत्त्वाची धार्मिक सुट्टीही मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये घालवावी लागली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन प्रशासनाकडून त्याला दिली जात असलेली वागणूक अत्यंत वाईट असल्याची टीका समर्थकांकडून करण्यात येत आहे.