पणजी – गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याच्या प्रस्तावावरून गोवा फॉरवर्ड पक्षात (जीएफपी) अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून जीएफपीचे कार्याध्यक्ष किरण कांडोलकर यांनी शनिवारी पक्षाला रामराम ठोकून तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
गोव्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्या राज्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील जीएफपी आणि कॉंग्रेसमध्ये आघाडी होण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्यावर शिक्कामोर्तब होण्याआधीच जीएफपीला गळती लागली.
कॉंग्रेसबरोबर जाण्याला विरोध दर्शवत कांडोलकर यांनी तृणमूलची वाट धरली. आगामी निवडणुकीसाठी जीएफपीने माझी उमेदवारी जाहीर केली. मात्र, माझ्या मतदारसंघात कॉंग्रेसने आधीच प्रचार सुरू केला आहे. अखेरच्या क्षणी कॉंग्रेस पक्ष जीएफपीचा हात सोडू शकतो.
भाजपचा पराभव करण्याविषयी कॉंग्रेस, आप हे पक्ष गंभीर वाटत नाहीत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी किंवा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करू शकत नाहीत. ती क्षमता केवळ तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यात आहे. त्यांनी ते पश्चिम बंगालमध्ये दाखवूनही दिले आहे, असे कांडोलकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
भाजपचे माजी आमदार असणाऱ्या कांडोलकर यांनी मागील वर्षीच जीएफपीमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांचा नवा पक्ष ठरलेला तृणमूल प्रथमच गोव्याच्या निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झाला आहे.