पुणे -विविध आजारांवरील 14 औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ही औषधे वेदनाशामक, खोकला, काही आजारांवरील प्रतिजैविके, अशी आहेत. ही औषधे आता बाजारातून परत मागवून घेण्याच्या सूचना “अन्न आणि औषध प्रशासना’ने (एफडीए) केल्या आहेत.
काही वर्षांपासून “एफडीए’ने या औषधांच्या तपासणीसाठी स्वतंत्र तांत्रिक समिती स्थापन केली होती. त्यांनी सुमारे 1 हजार 800 औषधांची तपासणी केली. त्यातील 200 औषधांचे उत्पादन बंद करून त्यावर बंदी आणण्याची शिफारस या समितीने केंद्र सरकारला केली होती.
त्यातील बहुतांश औषधांचे उत्पादन आधीच बंद झाले आहेत. मात्र, त्यातील आणखी 14 औषधांचे उत्पादन बंद करण्याबाबत न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा या औषधांची तपासणी करण्यात आली. परंतु बंदीबाबत केंद्र सरकारचे ठाम मत होते. त्यामुळे 14 औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला.
बंदी घातली जाते, तोपर्यंत बाजारात औषधे वितरित झालेली असतात. मात्र, या औषधांची खरेदी-विक्री थांबवण्याच्या सूचना संस्थेच्या सदस्यांना देण्यात आल्या आहेत. ज्या घाऊक विक्रेत्यांनी ते किरकोळ विक्रेत्यांना दिले आहेत ते गोळा करून संबंधित कंपनीकडे पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
-जगन्नाथ शिंदे, “महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.’
बंदी घातलेल्या औषधांची बाजारात विक्री करू नये, अशा सूचना वितरकांना देण्यात आल्या आहेत. तसेच केंद्राच्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येत असून, ती औषधे तातडीने बाजारातून मागवून घेतली जात आहेत.
-श्याम प्रतापवर,सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, पुणे विभाग
बंदी घातलेल्या औषधांची मिश्रणे
निमेसुलाइड आणि पॅरासिटेमोल, एमोक्सोलीन आणि ब्रोमहेक्सीन, फोल्कडाइन आणि प्रोमेथेजीन, क्लोरोफेनिरेमाइन, डीक्ट्रोमेथोरफेन, गुयाफेनेसिन, अमोनियम क्लोराइड आणि मेन्थोल, क्लोरोफेनिरेमाइन मेलिएट आणि कोडिन सिरप, अमोनियम क्लोराइड, ब्रोमहेक्सीन आणि डीक्ट्रोमेथोरफेन, ब्रोमहेक्सीन, डीक्ट्रोमेथोरफेन, अमोनियम क्लोराइड आणि मेन्थोल, डीक्ट्रोमेथोरफेन, क्लोरोफेनिरेमाइन, गुयाफेनेसि आणि अमोनियम क्लोराइड, पेरासिटेमोल, ब्रोमहेक्सीन, फेनइलफराइन, क्लोरोफेनिरेमाइन आणि गुयाफेनेसिन, सेलबुटामोल आणि ब्रोमहेक्सीन, क्लोरोफेनिरेमाइन, कोडीन फोस्फेट आणि मेन्थोल सिरप, फिनटोएन आणि फिनोबार्बीटोन सोडियम, अमोनियम क्लोराइड, सोडियम साइट्रेट, क्लोरोफेनिरेमाइन मेलेट आणि मेन्थोल, सब्लुटामोल, हाइड्रोक्सीथाइलथियोफिललाइन आणि ब्रोमहेक्सीन.