मुळशीतून कोकणात जाणारा रस्ता दोन दिवस बंद

पुणे – मुळशी तालुक्‍यातील ढगफुटी सदृश्‍य अतिवृष्टीमुळे पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्गावर मुळशी गोणवडी हद्दीत रस्त्यावरील दगडीपूल खचल्यामुळे केव्हाही ढासळू शकतो. त्यामुळे या महामार्गावर पुढील दोन दिवसांसाठी जड वाहनांना बंदी करण्यात येत आहे, अशी माहिती मुळशी तालुक्‍याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली आहे.

मागील तीन दिवसांपासून मुळशी तालुक्‍याला पावसाने जोडपले आहे. मुळसधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, रस्ते खचले, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही रस्ते व पुल धोकादायक झाले आहेत. पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्गावर मुळशी गोणवडी हद्दीतील दगडीपूल खचला आहे.

तो कोणत्याही क्षणी ढासळू शकतो. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी चांदणी चौक ते माणगाव पर्यंतच रस्ता जड वाहनांसाठी पुढील 48 तास बंद ठेवण्यात येणार आहे. तर हलक्‍या वाहनांना रस्ता पोलीस नियंत्रणामध्ये वाहतुकीसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे पर्यटकांना आणि या महामार्गावरून प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांना पुढील दोन दिवस या महामार्गावरून प्रवास करू नये असे आवाहन मुळशी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

“हा दगडीपुल असून याठिकाणी पर्यायी नवीन पुल बांधण्यात येणार आहे. एमएसआरडीसीकडून पुढील 48 तासात हा पुल बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये आवश्‍यक वाटल्यास वेळ वाढविण्यात येईल.” (अभय चव्हाण – तहसीलदार, मुळशी)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.