पुणे – अग्रमानांकित आद्या गवात्रे व कौस्तुभ गिरगावकर यांनी अनुक्रमे तेरा वर्षाखालील मुली व पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात शानदार विजय मिळवित फिनिक्स चषक टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपदाच्या आशा कायम ठेवल्या. आद्याने नीरजा देशमुख हिचा 11-5, 11-7,8-11,11-5 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. नीरजाने तिसरी गेम घेत सामन्यात उत्कंठा निर्माण केली मात्र आद्याने चौथ्या गेममध्ये नियंत्रण ठेवीत सामना जिंकला.
द्वितीय मानांकित दिया शिंदेने उपांत्यपूर्व फेरी गाठताना श्रीनिका उमेकरचे आव्हान 11-9, 11-4,11-2 असे संपुष्टात आणले. यंदाच्या मोसमात अनेक विजेतेपद मिळवणाऱ्या नैशा रेवसकर हिने मेधा कोत्रा हिच्यावर 11-7,11-4,11-4 अशी सहज मात केली आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात कौस्तुभ गिरगावकरने एकतर्फी लढतीत आयुष नंबीसन याला 11-7,11-5,11-7 असे पराभूत करताना टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला. त्यानंतर अनंत कर्मपुरीने क्षितिज जोशीला 12-10,11-9, 12-10 पराभूत केले. त्यानंतरच्या सामन्यात अर्जुन कुमार गुरुने सिद्धार्थ देशमुखवर विजय मिळविला.