पुणे – करोनामुळे भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी चार तास सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. कठोर निर्बंधांतही भाजीपाल्याची आवक मुबलक होत असली, तरी अपेक्षित मागणी आणि भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. लग्नसमारंभात उपस्थितीवर निर्बंध तसेच उपाहारगृहे, खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या बंद आहेत. त्याचा परिणाम भाजीपाला विक्रीवर झाला आहे. मागणी आणि विक्रीच नसल्याने हा शेतमाल फेकून देण्याची वेळ आली आहे.
मार्केट यार्ड घाऊक भाजीपाला आणि गूळ-भुसार बाजार शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस बंद आहे. अशा परिस्थितीत घाऊक बाजारात शेतमाल विक्रीस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतमाल नाशवंत असल्याने विक्री न झालेला माल परत घेऊन जाता येत नाही. निर्बंधामुळे किरकोळ खरेदीदार हात आखडता ठेवून भाजीपाला खरेदी करत आहेत. एरवी दोन ते तीन पोती भाजीपाला घेणारा किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेता खरेदी कमी प्रमाणात करतो आहे. किरकोळ भाजीपाला विक्री दुकानांवर वेळेचे बंधन असल्याने खरेदीच्या प्रमाणात घट झाली आहे, ग्राहकांना भाजी स्वस्त मिळत असली, तरी निर्बंधांमुळे भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे.
घरगुती ग्राहकांच्या तुलनेत पुणे-मुंबईतील हॉटेलचालक, खाद्यपदार्थ विक्रेते, खाणावळ चालक भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यावर सध्या निर्बंध आहेत. किरकोळ बाजारातही भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे बाजार समित्यांचे कामकाज बंद होते. यंदा निर्बंधांमुळे नियमावलीचे पालन करून भाजीपाला खरेदी-विक्री व्यवहार सुरू आहेत.
– विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड
आडते संघटना, पुणे
मागणी नसल्याने 20 टक्केभाजीपाला खराब
सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू तसेच भाजी मंडई सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवी मुंबई कृषी बाजार समितीत मुंबई, ठाणे परिसरातील किरकोळे विक्रेते खरेदीसाठी येतात. मात्र, भाजीपाल्याची अपेक्षित खरेदी होत नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस पाठविण्यात आलेल्या भाजीपाल्यापैकी 15 ते 20 टक्के भाजीपाला खराब होत असल्याची माहिती समितीतील अधिकाऱ्यांनी दिली.