कराड – महाविकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळात कराड उत्तरचे ना. बाळासाहेब पाटील यांना खा. शरद पवार यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ना. बाळासाहेब पाटील हे पहिल्यांदाच कराड शहरात येत असल्यामुळे दि. 5 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे रौप्यमहोत्सवी आमदार असणारे बाळासाहेब पाटील आता नामदार झाले आहेत. रविवार, दि. 5 रोजी ना. बाळासाहेब पाटील कराडमध्ये दाखल झाल्यानंतर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक दत्त चौकातून दु. 3 वाजता सुरू होणार आहे. कराड शहराच्या मुख्य बाजारपेठेतून दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक मार्गे प्रितीसंगमावरील आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन ना. पाटील घेणार आहेत. प्रीतीसंगमावरून परत चावडी चौक मार्गे मंगळवार पेठेतील आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या निवासस्थानी येऊन आदरणीय स्व. पी .डी. पाटीलसाहेब यांच्या प्रतिमेस ना. पाटील अभिवादन करणार आहेत.