रेडा -ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबात असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत झाली तरच ही मुले प्रगतीची पावले टाकतील. शहीद जवान आणि गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी मदत करून सावित्रीबाई फुले यांचे कार्य पुढे चालवावे, असे आवाहन इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शहा बोलत होत्या. माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. विद्या गायकवाड, सायरा आत्तार, माया विंचू, डॉ. सविता कुटे, कल्पना भोर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. जयश्री खबाले, सुनिता बेंद्रे उपस्थित होत्या. प्रास्ताविक वसतिगृह अधीक्षिका अश्विनी फाळके यांनी, सूत्रसंचालन राधिका खडके, पूजा झिंगाडे यांनी तर प्रियंका गोडसे या विद्यार्थिनीने आभार मानले.