गुरुग्राम – हरियाणातील जातीय हिंसाचारातील मृतांची संख्या आता सहा झाली झाली आहे. दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा आज मृत्यू झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र तन्वर यांनी सांगितले की, सोमवारी नूह येथे झालेल्या हिंसाचाराच्या वेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रदीप शर्मा यांच्यावर दंगलखोरांनी हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले होते.
दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. नूह येथे सुरू झालेला जातीय हिंसाचार मंगळवारी शेजारच्या गुरुग्राममध्ये पसरला. तेथे जमावाने एका मौलवीची हत्या केली, भोजनालय जाळले आणि दुकानांची तोडफोड केली. नूह येथे एका दिवसापूर्वी विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लोकांनी रस्ता अडवला आणि काही समुदायाच्या दुकानांची पाडापाडीही केली.