नवी दिल्ली – हरियाणात सुरु झालेल्या हिंसाचारामुळे एका इमामाला आपले प्राण गमवावे लागल्याची दुःखद घटना समोर आली आहे. समाज कंटकांनी मस्जिदीत घुसून इमाम म्हणून काम पाहणाऱ्या हाफिज सादची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. गुरुग्राम सेक्टर 57 मध्ये ही घटना घडली. हाफिज मुळचा बिहारमधील सीतामढी येथील रहिवासी होता.
हाफिज साद 1 ऑगस्टला सीतामढ़ीमधील मनियाडीह येथील आपल्या गावी परतणार होता. त्यासाठी त्याने तिकीट बुकिंग देखील केल्याचे समजते. परंतु त्यापूर्वी ३१ जुलैला झालेल्या हिंसाचारात समाज कंटकांनी चाकूने भोसकून त्याची हत्या केली.
हाफिजच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हाफिज सादचा भाऊ शादाब अन्वर म्हणाला की, लोकांना काही अडचण असेल तर त्यांनी मशीद व्यवस्थापनाशी चर्चा करायला हवी होती, मात्र यामध्ये माझ्या निष्पाप भावाचा काय दोष होता ?
मुलाच्या मृत्यूबद्दल समजल्यानंतर हाफिज सादची आई सनोबर खातून यांची खूप वाईट अवस्था आहे. त्यांची स्थिती पाहून अनेकांच काळीज हेलावलं. डिसेंबर 2022 पासून गुरुग्रामच्या मशिदीत तो इमाम होता. मंगळवारी रात्री त्याचा मृतदेह गावच्या घरी आला. बुधवारी दफन विधी झाला. यावेळी जड अंतकरणाने सर्व गाव वासियांनी त्याला अखेरचा निरोप दिला.