शिवमोगा (कर्नाटक) – कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे या ठिकाणचे वातावरण तापले असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तसेच या परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना दोन दिवसांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.
हत्या करण्यात आलेल्या 23 वर्षे वयाच्या कार्यकर्त्याचे नाव हर्षा असे होते आणि रविवारी रात्री भारती कॉलनी परिसरातल्या रविवर्मा मार्गावर काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.
हिजाबच्या मुद्द्यावरून शिवमोगामधील काही महाविद्यालयांमध्ये अलीकडेच तणाव निर्माण झाला होता. मात्र, हर्षा यांच्या हत्येमागे नेमके काय कारण होते, हे समजू शकलेले नाही. या हत्येनंतर बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी दगडफेक केली. मात्र, त्यांनी कोणाला लक्ष्य करण्यासाठी ही दगडफेक केली हे समजू शकलेले नाही.
या हत्येमागे मुस्लीम गुंडांचा हात असल्याचा आरोप शिवमोगाचे आमदार आणि राज्यातील ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री के. ईश्वरप्पा यांनी केला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे समाजविघातक घटकांना उत्साह आला असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवकुमार यांनी काही प्रक्षोभक वक्तव्ये केल्यामुळे मुसलमान गुंडांना चिथावणी मिळाल्याचे ते म्हणाले.
श्री राम सेनेचे समन्वयक प्रमोद मुतालिक यांनी पीपल्स, फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.
टोषींना लवकरच अटक केली जाईल- मुख्यमंत्री
या हत्येचा तपास सुरू केला गेला आहे आणि काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या हत्येतील दोषींना लवकरच अटक केली जाईल, अशी आशा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केली. कोठेही कोणतीही अप्रिय घटना घडू नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना आपण पोलिसांना दिल्या आहेत. कोणीही अफवांना बळी पडू नये, कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जावी, असे आवाहन बोम्मई यांनी केले.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी राज्याचे गृहमंत्री आरग्ग जानेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जानेंद्र यांनी या घटनेचे वृत्त समजल्यानंतर लगेचच रुग्णालयात जाऊन हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि मारेकऱ्यांना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले.