पुणे – चाकूचा धाक दाखवून टेम्पोवर दरोडा टाकल्याप्रकरणात अमोल भास्कर शेलार (रा. अहमदनगर) याला सत्र न्यायाधीश डी.पी.रागीट यांनी जामीन मंजुर केला. त्याच्यावर लुटमार आणि दरोड्याचे सात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला जामीन न देण्याचे म्हणणे तपास अधिकाऱ्याने दाखल केले. मात्र, त्याच्यावर पहिले कितीही गुन्हे दाखल असले, तरीही जामीन नाकारता येणार नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे अॅड. गणेश माने आणि अॅड. बालाजी थोरबोले यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रभाकर तिवारी वि. उत्तरप्रदेश सरकारच्या न्यायनिवाड्याचा दाखला त्यांनी दिला.
छोटा हत्ती टेम्पो चालकाला लुटून 28 जानेवारी 2021 रोजी 8 हजार 300 रुपये आणि दोन मोबाइल लांबविण्यात आले होते. यामध्ये शेलार याला शिरूर पोलिसांनी अटक केली असून, आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल आहे.
शिरूर पोलिसांनी अटक केलेल्या शेलार याने जामिनासाठी अॅड. गणेश माने, अॅड. बालाजी थोरबोले यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्यांना धनंजय गलांडे यांनी सहाय्य केले. त्याचे नाव एफआयआरमध्ये नाही. त्याच्याकडून पैसे किंवा शस्राची जप्ती करण्यात आलेली नाही. दोषारोपपत्र दाखल झाले असून, त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.