मंचर – येथे मास्क न लावता फिरणाऱ्यांवर मंचर पोलीस आणि ग्रामपंचायतीने कारवाईचा बडगा उचलत प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवार (दि. 27) करण्यात आली. दिवसभरात अंदाजे 35 नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस जवान गणेश डावखर यांनी दिली. मंचर शहरात स्थानिक रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकास करोनाची बाधा झाली, त्यामुळे प्रशासन “अलर्ट’ झाले आहे.
येथील विविध दुकानांत विविध वस्तू खरेदीसाठी सुमारे 40 गावांचा दैनंदिन संबध येतो. शहरातील काही नागरिक किंवा बाहेर गावावरून आलेले नागरिक तोंडावर मास्क किंवा रुमाल न लावता राजरोसपणे फिरत आहेत, त्यामुळे करोना संसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरून सरपंच दत्ता गांजाळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाण्याचे सहा पोलिस जवान, मंचर ग्रामपंचायतीचे दोन कर्मचारी यांच्या समन्वयातून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
मास्क न लावणाऱ्यांकडून जागेवरच दंड म्हणून 500 रुपये वसुल करण्यात आले. नागरिकांनी आवश्यक कामानिमित्तच घराबाहेर पडावे. तोंडावर मास्क लावावा, अन्यथा दंडास सामोरे जावे लागेल, असा इशारा सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिला आहे.