नगर -व्यापारपेठेतील बहुतेक भागांत नवे करोनाबाधित आढळून येत असल्याने व्यापाऱ्यांनी स्वत:हूनच व्यापारपेठ पुढील दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आज जाहीर केला. नगरमधील व्यावसायिकांतर्फे दी अहमदनगर आडतेबाजार व्यापारी असोसिएशनने ही घोषणा केली. असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा व सेक्रेटरी संतोष बोरा यांनी ही घोषणा केली. नगर शहर जिल्ह्याचे मुख्यालय असून, जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ आहे. मात्र, मागील दोन दिवसांत बाजारपेठेतच करोनाबाधित वाढत असल्याचे अहवाल प्राप्त होत आहेत. त्यामुळे बाहेरगावांहून येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांसाठी देखील ही धोक्याची घंटा असल्याने व्यापाऱ्यांनी आता व्यापारपेठच पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार आता बाजारपेठ बुधवारी उघडणार आहे. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मार्केट यार्ड, आडतेबाजार, डाळमंडई, तपकीरगल्ली, दाणेडबरा व जवळील परिसरातील व्यापारपेठ बंद असेल. त्याशिवाय बहुतेक भाग कन्टेन्मेंट झोन असल्याने तसाही बंदच राहणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस संपूर्ण नगर शहरच बंद असेल, अशी अवस्था आहे.