सिडनी: करोनाच्या महामारीमुळे जगभर 2 लाख 76 हजार 498 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 13 लाख 94 हजार 965 बाधितांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या सरकारने निर्बंध हटविण्याची योजना आखण्यास प्रारंभ केला आहे.
देशाला खुले करण्याची वेळ आली आहे. आम्ही तीन टप्प्यांमध्ये निर्बंध हटविणार आहोत. पहिल्या टप्प्यात शाळा, महाविद्यालये तसेच छोटी दुकाने सुरू केली जातील. दुसऱ्या टप्प्यात 20 लोकांना एकत्र येण्याची अनुमती असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 100 लोकांसह आयोजन करता येणार असल्याचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केले आहे.
अर्जेंटीनात टाळेबंदी कायम
अर्जेंटीना सरकारने देशात 24 मेपर्यंत टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु राजधानी ब्युनॉस आयर्स समवेत देशाच्या काही ठिकाणी निर्बंधांमध्ये सूट दिली जाणार आहे. अध्यक्ष एलबर्टो फर्नांनडेज यांनी याची घोषणा केली आहे. 20 मार्च रोजी देशात सर्वप्रथम टाळेबंदी लागू करण्यात आली होती.
व्हाइट हाउसचे दोन अधिकारी बाधित
अमेरिकेच्या अध्यक्षांचे कार्यालय म्हणजेच व्हाइट हाउसमधील दोन अधिकाऱयांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्या माध्यम सचिव केटी मिलर तसेच इवांका ट्रम्प यांच्या सचिवाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून व्हाइट हाउसमधील सतर्कता वाढविण्यात आली आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन विभागाचे आयुक्त स्टीफन हॅन दोन आठवडयांसाठी स्वयंविलगीकरणात राहणार आहेत. मिलर यांच्या संपर्कात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
चिनी पत्रकारांचा व्हिसा कालावधी घटविला
अमेरिकेने चिनी पत्रकारांचा व्हिसा कालावधी घटविण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी पत्रकार आता केवळ 3 महिन्यांसाठीच अमेरिकेचा व्हिसा प्राप्त करू शकणार असल्याची माहिती गृह सुरक्षा विभागाने दिली आहे. सद्यकाळात विदेशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी अमेरिकेत कुठल्याही प्रकारचा कालावधी निश्चित नव्हता. परंतु नव्या दिशानिर्देशांनुसार चीनचे पत्रकार 3 महिन्यांपेक्षा अधिक काळापर्यंत अमेरिकेत राहू शकणार आहेत.
ब्रिटनमध्ये 14 दिवसांचे विलगीकरण
ब्रिटनमध्ये विदेशातून येणाऱया लोकांसाठी 14 दिवसांचे क्वारेंटाईन अनिवार्य करण्यात येणार आहे. सरकारने सर्व एअरलाइन्सना या संबंधी निर्देश दिले आहेत. हा नवा नियम चालू महिन्याच्या अखेरच्या आठवडयात लागू होऊ शकतो. विदेशातून पोहोचणाऱया लोकांना स्वतःच्या घरात विलगीकरणाचे पालन करावे लागणार आहे. देशाच्या सीमेत प्रवेश करताच त्यांना स्वतःचा पत्ता नमूद करावा लागणार आहे.
कुवेतमध्ये 3 आठवडयांसाठी संचारबंदी
कुवेतने संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 3 आठवडयांसाठी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी रविवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासुन सुरू होत 30 मेपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती सरकारचे प्रवक्ते तारेक अल-मेजरेम यांनी दिली आहे. या कालावधीत वाहनांच्या वापरावर बंदी राहणार आहे. परंतु लोक संध्याकाळी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत घरानजीक व्यायाम करण्यासाठी बाहेर पडू शकतील.