वेलिंग्टन – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात ऑस्ट्रेलियात होणारी एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांची मालिका करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे रद्द करण्यात आली आहे. चॅपेल-हॅडली करंडकासाठी ही मालिका खेळवली जाणार होती.
मात्र, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियात करोनाचा धोका वाढला असून त्यामुळे सरकारने अत्यंत कठोर नियम लावले आहेत. देशात परदेशातून आलेल्या प्रत्येकाला पुढील 10 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियात येत्या 30 जानेवारीपासून एकदिवसाच्या तीन सामन्यांची मालिका खेळवली जाणार होती.
तसेच एक टी-20 सामनाही खेळवला जाणार होता. मात्र, करोनाचा धोका तसेच विलगीकरणाचे कठोर नियम यामुळेच या मालिका रद्द करण्याचा निर्णय न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने घेतला आहे. करोनामुळे न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा तिसऱ्यांदा रद्द करण्यात आला आहे.