सिडनी – वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. हा दुखापतीतून पूर्ण तंदुुरूस्त ठरला आहे. त्याचा आता भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघात समावेश होणार असल्याने यजमान ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली आहे.
या दोन संघातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ऍडलेड येथील पहिल्या सामन्याने येत्या गुरूवारपासून प्रारंभ होत आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या ठरतात हा इतिहास असल्याने आता स्टार्कची गोलंदाजी भारतीय फलंदाजांसाठी आव्हान ठरणार आहे. त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत भेदक गोलंदाजी केली आहे. त्यातच ही मालिका ऑस्ट्रेलियाचा संघ घरच्याच मैदानावर खेळत असल्याने त्यांना जास्त लाभ होणार आहे.
पहिला कसोटी सामना दिवस-रात्र असून गुलाबी चेंडूवर खेळला जाणार आहे. हा चेंडू नेहमीच्या लाल रंगाच्या चेंडूपेक्षा जास्त स्विंग होतो. त्यामुळे मुळातच स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टार्कची गोलंदाजी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात होता. त्याच्या कुटुंबीयातील एक जवळची व्यक्ती आजारी पडल्यामुळे त्याने या मालिकेतून माघार घेतली होती. स्टार्क आज (सोमवार) संघाबरोबर सराव करणार आहे.
दोन वर्षापूर्वी भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवला होता. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती. भारताच्या दिग्गज कर्णधारांना 71 वर्षात जे जमले नव्हते ते कोहलीच्या संघाने करून दाखवले होते. आता भारतीय संघ यंदा पुन्हा एकदा याच ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती करतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
कसोटी मालिका
पहिली कसोटी – 17 ते 21 डिसेंबर, एडिलेड
ओव्हल- दिवस-रात्र (प्रक्षेपण – सकाळी 9 वाजल्यापासून)
दुसरी कसोटी – 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न (पहाटे 5 वाजल्यापासून)
तिसरी कसोटी- 7 ते 11 जानेवारी 2021, सिडनी (पहाटे 5 वाजल्यापासून)
चौथी कसोटी- 15 ते 19 जानेवारी, 2021, गाबा (पहाटे साडे पाच वाजल्यापासून)
थेट प्रक्षेपण – सोनी सिक्स व डीडी स्पोर्टस.