पुणे – कृषी, औद्योगिक, व्यावसायिक आणि रहिवासी या कारणासाठी राज्य शासनाने दिलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर भोगवटादार वर्ग 2 अशी नोंद असते. या जमिनींचा मालकी हक्क संबधितांना देण्यासाठी भोगवटादार वर्ग 2 जमिनींचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपातंरण करण्याचा देण्याचा निर्णय मागील सरकारच्या काळात घेण्यात आला होता. आता या निर्णयाला महाविकास आघाडीने स्थगिती दिली आहे. गरजू व्यक्तींना याचा लाभ मिळावा, तसेच गैरप्रकाराने कोणी जमिनी लाटू नये, यासाठी या निर्णयास स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
वर्ग 2 च्या जमिनींची मालकी सरकारची असते. या भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी संबधित व्यक्तीच्या अथवा शेतकऱ्यांच्या मालकी हक्काने देण्याचा निर्णय 8 मार्च 2019 मध्ये घेण्यात आला. भोगवटार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रुपातंतर करण्यासाठी रेडी रेकनरच्या 50 टक्के रक्कम शासन दरबारी जमा करणे बंधनकारक होते. शासनाच्या या निर्णयामुळे संबधितांना जमिनीचा मालकी हक्क मिळत होता. तसेच शासनाच्या तिजोरीत महसुल जमा होत होता. आता महसुल विभागाने यासंदर्भात एक पत्रक काढले आहे. त्यामध्ये शासनाने भाडेपट्याने अथवा कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण करण्याच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.
पूर्वी शासनाकडे जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत्या. या जमिनीचे संरक्षण होण्यासाठी त्यावर अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून शासनाने जमिनींचे वाटप केले. मात्र सातबारा उताऱ्यावर वर्ग -2 (मालक सरकार) अशी नोंद घालण्यात येते. त्यामुळे या वर्ग दोनच्या जमिनींची विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अधिमूल्य भरावे लागते. अशा जमिनींसाठी प्रत्येक वेळी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. या अधिमूल्यातून राज्य शासनाला सर्व राज्यांतून दरवर्षी एक हजार कोटींचा महसूल मिळतो.
त्यामुळे वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यास परवानगी दिली तर शासनाला तोटा सहन करावा लागेल, असे सांगत तत्कालीन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यास नकार दर्शविला होता. मात्र या जागा कायमस्वरुपी मालकी हक्काने दिल्या तर त्यातून शासनाला एकरकमी पैसे मिळतील. यातून मिळणारा महसूलही जास्त असेल. याबाबींचा विचार करून तत्कालीन सरकारने हा निर्णय घेतला होता. आता यास स्थगिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.